Tuesday, September 29, 2009

पैसा... पैसा...पैसा...

बऱ्याच जणांच्या डोक्यात 'पैसा = करिअर' असं समीकरण पक्क असतं. परंतु हे पूर्णसत्य नाही. करिअर म्हटलं की पैसा आला
च. परंतु फक्त पैसा म्हणजे करिअर नव्हे हे पालकांनी लक्षात घ्यायला हवं आणि ते मुलांच्या मनावरही बिंबवायला हवं. करिअर म्हणजे उत्तम रितीने जगणं, आपले छंद जोपासणं, समाजासाठी काहीतरी करणं, पुस्तकं वाचणं, चांगले चित्रपट, नाटक, कार्यक्रम पाहणं, कुटुंबासोबत वेळ (चांगला) घालवणं. नोकरी किंवा व्यवसाय करताना पैसा मिळवावा. याचा अर्थ असा नाही की पैशांच्या अभावात जगावं. परंतु म्हणून आयुष्यावर पैशांचा प्रभाव पडू देऊ नका. पैशांपेक्षाही अधिक चांगल्या आणि 'मौल्यवान' गोष्टी आहेत हे लक्षात घ्या. आजच्या काळात बरेचजण पैशांचा विचार करतात. त्याच्यामागे ऊर फुटेस्तोवर धावतात. परंतु अशावेळी प्रत्येकाने आपल्याला किती पैसा हवा आहे, याचा गंभीरपणे विचार करायला हवा. त्यानुसार आपल्या करिअरची आखणी करावी. कारण पैसा जितका कमवाल तितका तो कमीच असतो. त्यामुळे त्याच्या सीमारेषा आपणच आपल्या ठरवायला हव्यात. त्याबरोबरच आपल्या छंदांना, कुटुंबीयांना आणि आवडत्या इतर गोष्टींना आपण किती वेळ देणार आहोत याचाही विचार करायला हवा. आता तुम्ही मला विचाराल की याचा आणि करिअरचा काय संबंध? संबंध आहे. मागच्या काही लेखांमध्येही मी हे तुम्हाला सातत्याने सांगतोय. वर सांगितलेल्या सगळ्या गोष्टींचा परस्पर संबंध तुमच्या करिअरशी आहे. तुमच्या व्यक्तिमत्त्वाशी आहे. उदाहरणच द्यायचं तर, समजा एखाद्या माणसाला फिरण्याची खूप आवड आहे. परंतु तो त्याच्या व्यवसायामुळे किंवा ऑफिसातल्या कामांमुळे फिरायला बाहेर जाऊच शकला नाही तर काम करताना त्याचं मन त्या कामात लागत नाही. ते दूर कुठल्यातरी माळरानावर किंवा पर्वतांवर गेलेलं असतं. त्याचा परिणाम त्याच्या कामावर होतो. हेच जर तो फिरायला गेला. सहाजिकच तो रूटिनमधून थोडा फ्री होऊन रिफ्रेश होतो. मग तो आपल्या कामावर पूर्ण एकाग्र होऊन जास्तीत जास्त चांगलं काम करू शकतो. त्यामुळे पालकांनो आणि मुलांनो, आपले छंद जोपासा, खूप वाचा, फिरायला जा, चर्चा करा आणि सोबत मार्क्ससाठी लागणारा अभ्यासही भरपूर करा. कारण शिकणं ही तर आयुष्यभर चालणारी प्रक्रिया आहे!

No comments:

Post a Comment