Tuesday, September 22, 2009

जेव्हा माजी आमदार गेले 'रोहयो'च्या कामावर

वर्ष १९७२... दुष्काळ पडलेला आणि "ते' माजी आमदार होते; पण "आजी' असतानाही पदाची नशा नव्हती, तर आता ती काय राहणार? मग ते गेले चक्क रोजगार हमी योजनेच्या कामावर... "राजकारणातील छोटेसे पद हीच काही पिढ्यांच्या उदरनिर्वाहाची हमी' झालेल्या आजच्या काळात यावर कोणी विश्‍वास ठेवणार नाही; मात्र १९६७ ते १९७२ या काळात आमदार राहिलेले (कै.) बापूराव कृष्णाजी तथा बी. के. देशमुख त्यांच्या असाधारणतेमुळे आजही अकोलेवासीयांच्या स्मरणात आहेत.सध्या विधानसभा निवडणुकीचा "ज्वर' आधुनिक पुढाऱ्यांच्या अंगात भिनत असताना इथले लोक मात्र (कै.) देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देत आहेत. भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर निवडून आलेल्या देशमुखांच्या आमदारकीचा काळ, त्यांची निरपेक्ष वृत्ती, निरिच्छ वर्तन आणि निःस्वार्थीपणा गावोगावच्या पारांवर रंगणारा विषय आहे. (कै.) देशमुख पंचायत समितीचे सभापती असताना तालुक्‍याला "आदर्श पंचायत समिती'चा पुरस्कार मिळाल्याची आठवणही आवर्जून सांगितली जाते.१९७२ च्या निवडणुकीत (कै.) देशमुख वसंतराव भांगरे (कॉंग्रेस) यांच्याकडून पराभूत झाले. १९७२ मधील पावसाने राज्यासह अकोले तालुक्‍यालाही "ठेंगा' दाखविला. त्यामुळे खरीप पीक वाया तर गेलेच; परंतु रब्बीही हाती आले नाही. जनावरांबरोबरच माणसांच्या जगण्याची भ्रांत निर्माण झाली. त्या काळात (कै.) देशमुख पत्नी पार्वताबाई यांच्यासह रोजगार हमी योजनेच्या कामावर जात होते. कुटुंबातील पोरा-थोरांसह "किडका मिलो' व "सडका गहू' खात होते. नुकतीच आमदारकीची वस्त्रे सोडलेल्या या माणसाने आपले पाय नेहमीच जमिनीवर ठेवले, असे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कारभारी उगले यांनी "सकाळ'ला सांगितले.देशमुख यांचे चिरंजीव जयवंत या वेळच्या निवडणुकीत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा झेंडा खांद्यावर घेऊन निवडणूक रिंगणात उतरले आहेत. जयवंत देशमुखांचे चिरंजीव राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पंचायत समिती सदस्य आहेत.भांगरे यांचा साधेपणा - राजकारणातील साधेपणा हा अकोले भागाचा स्थायीभावच असावा; कारण १९५२ मध्ये निवडून आलेले गोपाळा भांगरे (कॉंग्रेस) हेदेखील लोकांना आठवतात ते केवळ त्यांच्या साध्या राहणीसाठी. दारी आलेल्याच्या मुखात दोन घास पडतील, हा त्यांचा अतिथिभाव होता. १९५७ मध्ये समाजवादी पक्षाचे नारायण नवाळी निवडून आले; परंतु १९६२ मध्ये आमदारकी जाताच या माजी आमदाराने चक्क पेढेविक्रीच्या दुकानात गल्ल्यावर बसणे पसंत केले. त्यांच्या वारसदारांना आजही राहण्यासाठी घर नाही. १९६२ मध्ये गोपाळा भांगरे यांच्या पुतण्याकडे यशवंतराव भांगरे यांच्याकडे आमदारकी आली. ६२ व ७२ मध्ये कॉंग्रेसकडून आणि नंतर १९७८ मध्ये समाजवादी कॉंग्रेसकडून निवडून आलेल्या यशवंतरावांनी "खानदानी राजकारण' केले. प्रचाराची पातळी सोडली नाही. प्रचार संपल्यानंतर घरी परतणाऱ्या स्पर्धक उमेदवाराच्या कार्यकर्त्यांना घरी नेऊन जेवू घातले. त्या घटनेचे साक्षीदार व विडी कामगार जैनुद्दीन शेख यांना तो प्रसंग आजही आठवतो. आज निवडणुका महाखर्चिक बनत असताना आणि निवडणुकीतील स्पर्धा शत्रुत्वाचे स्वरूप धारण करीत असताना देशमुख, नवाळी, भांगरे यांच्यासारखी माणसे काहीशा आख्यायिकाच बनल्यासारखी झाली आहेत.

No comments:

Post a Comment