>
जगात एक अब्जाहून जास्त लोक उपाशी आहेत. दर पाच सेकंदांनी एक मूल भुकेमुळे हे जग सोडून जातं. भुकेच्या या फेऱ्यात
तिसऱ्या जगातले देश आहेतच, पण असंख्य भारतीयांना आपलं 'ड्रीम डेस्टिनेशन' वाटणारी अमेरिकाही आहे. संयुक्त राष्ट्रांच्या अलीकडेच झालेल्या अन्नसुरक्षा परिषदेत ही आकडेवारी समोर आली. तिला आधार अमेरिकेच्या शेतीखात्यानं केलेल्या पाहणी अहवालाचा आहे. या अहवालानुसार अमेरिकेतील पाच कोटींहून अधिक लोक रोज उपाशी किंवा अर्धपोटी झोपी जातात.
या अहवालानं अमेरिकन सरकारची झोप मात्र उडाली आहे. वाढती बेकारी, अत्यंत कमी पगाराची कामं यामुळं दर सहा माणसांमागं एकाला पुरेसं अन्नधान्य विकत घेणं मुश्कील झालं आहे. 'हा आकडा म्हणजे सावधानतेचा इशारा आहे... देशातल्या अन्नसुरक्षेबाबत, भरणपोषणा-बाबत आणि वाढत्या भुकेबाबत सावध करणारा इशारा...!' असे उद्गार अमेरिकेचे शेती सचिव टॉम विल्सॅक यांना काढावे लागले यातच सर्व आलं. हा पाहणी अहवाल २०१०मध्ये पूर्ण स्वरूपात प्रकाशित होईल. तोपर्यंत भुकेल्या लोकांचा आकडा आणखी भयावह झालेला असेल, अशी भीतीही विल्सॅक यांनी व्यक्त केली आहे. या अहवालानुसार सुमारे पावणेसात कोटी लोकांना नियमित आणि पुरेसं खायला मिळत नसल्यानं ते 'निकृष्ट अन्नसुरक्षा' लाभलेल्या वर्गवारीत मोडतात. त्यांच्यापैकी ९६ टक्के लोकांची अवस्था अशी की, त्यांनी एक वेळचं खाणं आणलं तर दुसऱ्या वेळचं आणेपर्यंत त्यांच्याकडले पैसे संपलेले असतात. यांपैकी कुणालाही संतुलित आहार वगैरे पाहायलाही मिळत नाही. गेले वर्षभर हीच अवस्था या लोकांच्या वाट्याला आलेली असली, तरी गेल्या तीन-चार महिन्यांत तिची तीव्रता वाढली आहे. या पावणेसात कोटी लोकांपैकी निम्म्या लोकांचं वजन घटलेलं आहे. अशा घरांतल्या अर्धपोटी मुलांची संख्या आहे १ कोटी ७ लाख. घरात असेल नसेल ते मुलांना खाऊ घालून आईवडील उपाशी राहिले तरी तीव्र भुकेशी सामना करावा लागणाऱ्या मुलांची संख्या एक कोटीच्या खाली जात नाही.
आणखी काही कोटी अमेरिकन इतके गरीब आहेत की, सरकारकडून त्यांना 'फूड स्टँप्स' तरी मिळतात किंवा 'फीडिंग अमेरिका'सारख्या फूड बँकांकडून अन्न मिळतं! त्यामुळे त्यांचा उपास टळलाय. वेस्ट व्हजिर्नियासारख्या राज्यांत तर दर सहामागं एकाला फूड स्टँपवरच जगावं लागतंय. आपल्या २०० फूड बँकांमार्फत अडीच कोटी अमेरिकनांना अन्नपुरवठा करणाऱ्या 'फीडिंग अमेरिका'चे प्रमुख विकी एस्कारा यांना ही स्थिती आणखी बिघडत जाण्याची चिन्हं दिसत आहेत. त्यांच्या मते हे आकडे २००८चे आहेत आणि गेल्या वर्षभरात परिस्थिती इतकी खालावलीय की ते आता नक्कीच वाढलेले असतील. फीडिंग अमेरिकाकडे आजवरच्या इतिहासात नव्हती इतकी 'इमर्जन्सी फूड'ची मागणी दिवसागणिक वाढलीय. गेल्या वर्षभरात या बँकांना आपल्या साठ्यांत ५० टक्क्यांहून अधिक वाढ करावी लागलीय. या स्थितीत अधिकाधिक लोकांना फूड स्टँप देण्याचा निर्णय ओबामा सरकारला घ्यावा लागलाय.
अमेरिकेत गेल्या वर्षापासून असलेली मंदी या भुकेमागं आहे हे खरं आहे; पण गोऱ्यांची बहुसंख्या असलेल्या उत्तरेच्या तुलनेत दक्षिणेकडील मिसिसिपी, टेक्सास व अर्कान्सास ही राज्यं भुकेच्या फेऱ्यांत वाईट पद्धतीनं सापडली आहेत. उपाशी, अर्धपोटी असलेल्यांत कृष्णवणीर्य आणि हिस्पॅनिक नागरिकांची टक्केवारी निम्म्याहून अधिक आहे... अमेरिकेतल्या या वास्तवात आणि आपल्या वास्तवात काही साम्य आहे, असं नाही वाटत तुम्हाला?
Friday, December 11, 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment